नारायणगाव, दि. १७ (प्रतिनिधी):
नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलतानपूर येथे तब्बल ३६ ऊसतोड कामगारांना जवळपास दोन वर्षे सक्तीने काम करून घेतल्याचा आणि त्यांच्या कामाचा मोबदला न देता त्यांना वेठ बिगाराप्रमाणे ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी एका व्यक्तीविरुद गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सुरेश रवींद्र सोनवणे (वय ३०, मूळ रा. एरंडोल, जि. जळगाव, सध्या रा. सुलतानपूर, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खंडू भानुदास माने (वय ३६, रा. वळती, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांच्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मे २०२४ पासून आजपर्यंत खंडू भानुदास माने यांच्याकडे सुरेश रवींद्र सोनवणे यांच्यासह एकूण ३६ ऊसतोड कामगार काम करत होते. या कालावधीत त्यांच्याकडून दररोज १२ ते १८ तास काम करून घेतले जात होते. मात्र, केलेल्या कामाचा कोणताही हिशोब न करता त्यांना मजुरी देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.तसेच, काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, आई-बहिणीवरून शिवीगाळ आणि दमदाटी केली जात होती एवढेच नव्हे तर, संबंधित कामगारांचे मोबाईल फोन आणि आधार कार्डे आरोपीने स्वतःकडे ठेवून त्यांना तेथून जाऊ न देता सक्तीने काम करून घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), १२७(४), ३५१(२) तसेच वेठ बिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम, १९७६ मधील कलम १६, १७, १८ आणि १९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. डी. भुसावरे व पोलीस उपनिरीक्षक जे. आय. पाटील काम पहात आहेत.



