घोडेगाव प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बंद घरे, हॉटेल तसेच घराबाहेर ठेवलेल्या घरगुती वस्तूंची चोरी करणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि घोडेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली. शहाजी ज्ञानदेव सोनवणे (वय २४, रा. पंचलिंगवस्ती, जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणत सुमारे ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आंबेगाव तालुक्यात रात्रीच्या वेळी बंद घरे, हॉटेल तसेच घराबाहेर ठेवलेली तांब्याची भांडी, बंब, शेगडी आदी वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व घोडेगाव पोलिसांकडून सुरू होता. चोरीच्या घटनांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चोरट्याने गुन्ह्यांसाठी टेम्पोचा वापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हा टेम्पो जुन्नरच्या दिशेने गेल्याचेही तपासात समोर आले.
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित टेम्पो जुन्नर येथील पंचलिंगवस्तीचा असून शहाजी सोनवणे हा तो वापरत असल्याचे समोर आले. सोनवणे हा टेम्पोसह चिंचोली कोकणे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. संशयित टेम्पोसह आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता सोनवणे याने आंबेगाव तालुक्यातील तीन घरफोड्या आणि तीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून गुन्ह्यांमध्ये वापरलेला महिंद्रा व्हेरो टेम्पो (क्रमांक एमएच ९४, एनई ६८२०) तसेच चोरीस गेलेले तांब्याचे बंब, भांडी, शेगडी आदी साहित्य जप्त करण्यात आले.या कारवाईत घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, घोडेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.



