नारायणगाव, ता. ९ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणांवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) कारवाईचा बडगा उगारला आहे. खेड ते आळेफाटा दरम्यान महामार्गाच्या हद्दीत झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सात दिवसांच्या आत अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतीत अतिक्रमणे न काढल्यास पोलिस बंदोबस्तात थेट कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, भोसरी ते खेड या टप्प्यात गुरुवारपासून (ता. १०) पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक सल्लागार दिलीप शिंदे यांनी दिली.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी खेड ते आळेफाटा दरम्यान महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. खेड, मंचर आणि नारायणगाव येथे जुन्या महामार्गाला समांतर चारपदरी बाह्यवळण रस्ते उभारण्यात आले. यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात आल्याने या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली होती.

मात्र, गेल्या वर्षभरापासून बाह्यवळण रस्त्यालगत पुन्हा अतिक्रमणांना ऊत आला आहे. पत्र्यांची शेड, पक्की बांधकामे, टपऱ्या, हातगाड्या तसेच जाहिरात फलक उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी महामार्गालगत भराव टाकून जागा बळकावण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे भविष्यात महामार्गाची वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
महामार्गाच्या मध्यापासून ठराविक हद्दीत कारवाई
नाशिक फाटा ते खेड दरम्यान महामार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना सुमारे २० ते २२ मीटर अंतरातील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. तर नारायणगाव बाह्यवळण रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना ३० मीटर अंतरातील अतिक्रमण कारवाईच्या कक्षेत येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग दिला आहे. त्यानुसार खेड ते आळेफाटा दरम्यानच्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून स्वेच्छेने अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा प्रशासनाकडून कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे महामार्गालगतच्या अनधिकृत बांधकामांवर आणि व्यवसायांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.



