नारायणगाव प्रतिनिधी:
डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि हायस्पीड स्किल हब, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने, सौ. सुरेखा पांडुरंग तोडकर व ग्रामपंचायत गुंजाळवाडी यांच्या विशेष सौजन्याने व सहकार्याने गरजू महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ४० दिवसीय मोफत ‘शिवणकला प्रशिक्षण वर्गाचा’ शुभारंभ मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी गुंजाळवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविणे, तसेच ग्रामीण भागातील महिलांना गावातच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास दरेकर म्हणाले की, “डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील सर्व घटकांतील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना मदत व संधी उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.महिलांना रोजगाराच्या दिशेने एक पाऊल या ४० दिवसीय प्रशिक्षणामध्ये सहभागी महिलांना मोफत शिवणकला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी महिलांना प्रशिक्षण प्रमाणपत्र (Certificate) तसेच उद्यम आधार कार्ड देण्यात येणार असून, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे महिलांना कौशल्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉ. एफ. बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, सरपंच दिव्या सोलाट, माजी सरपंच रेश्मा वायकर, सुरेखा तोडकर, पांडुरंग तोडकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित चव्हाण, जयशिंग वायकर, गणेश मेहेर, रमेश ढवळे, प्रशिक्षक छाया पाटील, मुख्याध्यापिका प्रतिभा कदम, ग्रामपंचायत सदस्या पूजा सोलाट व स्वाती शिंदे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

“कौशल्यातून सक्षमतेकडे…” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर, महिला प्रशिक्षणार्थी आणि ग्रामस्थांनी मनापासून स्वागत व कौतुक केले.




