जुन्नर प्रतिनिधी:
सोमवार दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी भाद्रपद श्री गणेश चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाद्रपद श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून देवस्थान ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. दिवसभरात असंख्य भाविक भक्तांनी ‘श्री गिरीजात्मज’ गणेशाचे दर्शनाचा लाभ घेतला.

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ०६.१५ वाजता देवस्थानचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविक भक्तांनी श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला. भाद्रपद श्री गणेश चतुर्थीनिमित्त सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत मंदिरात ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर पारंपारिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच देवस्थान ट्रस्टचेवतीने भाविक भक्तांकरीता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त ‘श्री गिरीजात्मज’ गणेशाच्या मुर्तीस व मंदिर परीसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाचे नैवेद्याकरीता मुंबई येथील फळांचे व्यापारी राम मारुती कोकणे यांनी २ कॅरेट विविध प्रकारची फळे तसेच गोळेगाव येथील संजय पांडूरंग वाणी यांनी २ कॅरेट केळी प्रसाद दिला. मंदिरात सकाळी ७ वाजता, दुपारी १२.१५ वाजता व सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिकविधी करण्यात आले तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने व देवस्थानचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. भाविक भक्तांना दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्या वतीने केले होते.

दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. मंगळवार दि.१५ सप्टेंबर २०२६ रोजी ऋषीपंचमी निमित्त सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत भाविक भक्तांकरीता सामूहीक श्री गणेश अथर्वशीर्ष पठण आयोजीत केलेले आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.



