नारायणगाव प्रतिनिधी : नारायणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे गहाळ झालेल्या १८ मोबाईल फोनचा शोध घेऊन ते संबंधित नागरिकांना परत केले आहेत. या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जानेवारी २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते. या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलचा तसेच तांत्रिक विश्लेषणाचा वापर केला. त्यातून विविध कंपन्यांचे १८ मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. हे मोबाईल पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून तसेच काही अन्य राज्यांतून हस्तगत करण्यात आले असून, संबंधित मालकांना परत देण्यात आले आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे, डीबी पथकाचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक पाटील तसेच पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई सोमनाथ डोके, सत्यम केळकर, टिलेश जाधव आणि आदेश दहिवाळ यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

दरम्यान, यापूर्वीही नारायणगाव पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई केली होती. त्या वेळी सुमारे १२ लाख १६ हजार रुपये किमतीचे ६३ मोबाईल फोन शोधून हस्तगत करण्यात आले होते. तसेच २०२५ ते २०२६ या कालावधीत नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेल्या सुमारे १६ लाख ५४ हजार रुपये किमतीचे ८७ मोबाईल फोन शोधून नागरिकांना परत करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
गहाळ मोबाईल फोन शोधून ते नागरिकांना परत मिळवून देण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.



