मंचर प्रतिनिधी: मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांड्यांच्या पत्राशेड गोडाऊनचे कडी-कोयंडे तोडून तांबा-पितळ भंगार तसेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि मंचर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ७ लाख ८६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी सुमीत जेठमल पुनामीया, रा. जुना बाजारपेठ, मंचर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७३/२०२६ अन्वये १० ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मांगवाडा, मंचर येथील त्यांच्या भांड्यांच्या पत्राशेड गोडाऊनचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर गोडाऊनमधील जुना तांबा-पितळ भंगार आणि Hikvision कंपनीचे सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन असा सुमारे ३ लाख ८२ हजार ७०० रुपयांचा माल चोरीला गेला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोडाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरट्यांचा माग काढला असता आरोपी श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोफियान मुस्ताक शेख (वय २४, रा. वार्ड क्रमांक २, बजरंग चौक, श्रीरामपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने मंचर येथील आरिफ अस्लम नायकोडी व इतर साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान पोलिसांनी २९७ किलो वजनाची पितळी धातूची मोड आणि ३५८ किलो वजनाची तांब्याची धातूची मोड, असा एकूण ५ लाख ३६ हजार २०० रुपयांचा चोरीचा माल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख ८६ हजार २०० रुपये आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघामोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.



