नारायणगाव प्रतिनिधी : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र दोन अनोळखी चोरट्यांनी मोटारसायकलवरून येत पाठीमागून हिसकावून नेल्याची घटना नारायणगाव येथे घडली. या घटनेत महिला डांबरी रस्त्यावर पडल्याने त्यांच्या चेहऱ्यासह हात-पायाला गंभीर दुखापत झाली असून उजव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ सप्टेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता नारायणगाव येथील नारायणवाडी रोडवरील येवला पैठणी दुकानासमोर घडली. पुष्पलता भोर या सकाळी चालत जात असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र हिसकावले आणि तेथून पसार झाले.
मंगळसूत्र हिसकावताना जोराचा धक्का बसल्याने पुष्पलता भोर या रस्त्यावर पडल्या. त्यांना चेहऱ्याच्या उजव्या बाजूस, कपाळावर, तोंडाला, दातांना तसेच उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली. तसेच उजव्या हाताच्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे.

हिसकावून नेलेल्या सोन्याच्या मण्यांच्या मंगळसूत्राची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये आहे.
या प्रकरणी संतोष निवृत्ती भोर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.



