नारायणगाव, ता. १३ : जुन्नर तालुक्याच्या राजकारणातील आक्रमक आणि प्रभावी महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजप नेत्या आशा दत्तात्रय बुचके (वय ६०) यांचे आज पहाटे मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकारणातील एक आक्रमक महिला आवाज कायमचा हरपला आहे.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता वैष्णव धाम (ता. जुन्नर) येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नाना खैरे आणि मंडल अध्यक्ष आशिष माळवदकर यांनी दिली.
आशा बुचके यांनी २००२ मध्ये जुन्नर तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला. त्यापूर्वी त्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या म्हणून मुंबई येथे कार्यरत होत्या. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी २००७ मध्ये सावरगाव-येणेरे गटातून त्यांना शिवसेनेची उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत सलग चार वेळा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले राजकीय स्थान मजबूत केले.
शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुखापासून जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदापर्यंत त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. जुन्नर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर पंचायत समिती तसेच नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकला.
पुणे जिल्हा परिषदेतही त्यांनी आक्रमक आणि अभ्यासू सदस्य म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात ठामपणे भूमिका मांडणाऱ्या सदस्य म्हणून त्यांची प्रतिमा होती.
२००९ ते २०२४ या कालावधीत त्यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडणूक लढवली. २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून, तर २०१९ आणि २०२४ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र, चारही निवडणुकांत त्यांना यश मिळाले नाही. आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले.
२०१९ मध्ये पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. त्यानंतर १९ ऑगस्ट २०२१ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना, त्यानंतर अपक्ष आणि पुन्हा भाजप असा त्यांच्या राजकीय वाटचालीचा प्रवास राहिला.
फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या पराभवानंतरही त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सक्रियता कायम ठेवली होती. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणाऱ्या बुचके कार्यकर्त्यांसाठी चोवीस तास उपलब्ध असत.
राजकारणासोबतच समाजकारणाचीही त्यांना विशेष आवड होती. संघर्षाची भूमिका, आक्रमक वक्तृत्व आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वैशिष्ट्ये मानली जात होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आशा बुचके यांच्या निधनाने जुन्नर तालुक्याच्या राजकारणातील एक लढवय्या, आक्रमक आणि सातत्याने कार्यरत राहिलेले महिला नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.



