नारायणगाव प्रतिनिधी : वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षात भरीव आर्थिक प्रगती नोंदवत दोन कोटी २२ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. संस्थेच्या या आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना १२ टक्के लाभांश तसेच दिवाळी भेटवस्तू देण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष दीपक अशोक (अप्पा) खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी संस्थेचे संस्थापक स्व. अशोक खैरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या ‘स्व. अशोक अप्पा खैरे जीवन गौरव पुरस्काराने’ जागतिक सर्पदंश तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत व डॉ. लहू खैरे यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेचे मार्गदर्शक संतोष खैरे यांनी पतसंस्थेच्या सर्व शाखांसाठी स्वमालकीच्या इमारती उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली. सभासदांचा संस्थेवरील विश्वास कायम ठेवत एकोप्याने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नवीन शाखा सुरू करण्यासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.
अध्यक्ष दीपक खैरे व उपाध्यक्ष सदानंद खैरे यांनी सांगितले की, ग्राहकांना अधिक गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने आरटीजीएस व एनईएफटी सुविधा सुरू केली आहे. संस्थेला सलग सहाव्या वर्षी लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे. सभासदांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. थकबाकीचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात संस्थेला यश आले असून योग्य पद्धतीने कर्जवाटप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन तोडकरी यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. अमोल पानसरे यांनी सूत्रसंचालन केले.
पतसंस्थेची आर्थिक स्थिती
सभासद संख्या : ९ हजार १०१
ठेवी : १६० कोटी ६० लाख रुपये
कर्जवाटप : १३३ कोटी ८३ लाख रुपये
निव्वळ नफा : २ कोटी २२ हजार रुपये
गुंतवणूक : ५३ कोटी १६ लाख रुपये
खेळते भांडवल : १९३ कोटी १२ लाख रुपये
एकूण उत्पन्न : १८ कोटी १० लाख रुपये
सभेत ज्येष्ठ सभासद संतोष खैरे, दादाभाऊ खैरे, सुरेश वाणी, आशिष माळवदकर, विठ्ठल औटी, सचिन खैरे, सत्यवान थोरात आदींनी चर्चेत सहभाग घेतला. संस्थेच्या प्रगतीबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त करून संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे, मानद सचिव राजेंद्र पाटे, ज्येष्ठ संचालक विलास वाजगे, प्रभाकर तहू, अशोक पाटे, संग्राम फुलवडे, एकनाथ शेटे, सुनील भुजबळ, डॉ. पंकज वाव्हळ, प्रशांत खैरे, अभय कोठारी, डॉ. रवींद्र गिरी, मीना भोर, रूपाली पाटे, शिवाजी तोडकरी, सचिन फुलसुंदर, चंद्रकांत बढे यांच्यासह संचालक, अधिकारी व सभासद उपस्थित होते.



