नारायणगाव प्रतिनिधी : नारायणगाव : नारायणगाव- जुन्नर रस्त्यालगत असलेल्या गौरीशंकर सोसायटीच्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत सोसायटीमधील १५ सदनिकाधारकांचे पंधरा मीटर जळून खाक झाले. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत नारायणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश पाटे यांनी फायर एक्सटिंग्विशर सिलेंडरद्वारे तातडीने आग विझवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीचे निश्चित कारण कळू शकले नाही. मीटर जळाल्याने सोसायटीमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

वीज कंपनीने तातडीने नवीन मीटर बसवून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सोसायटीचे खजिनदार सुनील रोकडे, संजय थोरवे यांनी केली आहे. याबाबत संजय थोरवे म्हणाले, “सोसायटीमध्ये नुकतेच स्मार्ट मीटर बसवण्यात आले होते. ज्या रोहित्रामधून (डीपी) सोसायटीला वीज पुरवठा केला जातो त्या रोहित्रामध्ये बिघाड झाला असून वारंवार स्पार्किंग होत आहे. आज सकाळी रोहित्रामध्ये स्पार्किंग झाले. त्यानंतर सोसायटीमधील मीटर बॉक्सला आग लागली. वीज कंपनीने या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणी सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे.



