वडगाव आनंद प्रतिनिधी
३१ ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या आणे (ता. जुन्नर) येथील संदीप सुदाम शिंदे (वय ३८) या तरुणाचा मृतदेह बुधवारी (२ सप्टेंबर) आबाटेक येथील जंगल परिसरात आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

संदीप शिंदे हे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी दुचाकीवरून टोमॅटोचे पैसे आणण्यासाठी नारायणगाव येथे गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे वडिलांशी फोनवर संभाषण झाले. त्यानंतर त्यांचा मोबाईल संपर्काबाहेर गेला.
दरम्यान, १ सप्टेंबर रोजी आळे-बोरी रस्त्यावरील बोरी बुद्रुक हद्दीतील कालव्याच्या पुलाजवळ त्यांची दुचाकी, मोबाईल, पाकीट व चावी आढळून आली. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसर तसेच कालव्याच्या पात्रात शोध घेतला. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

बुधवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास आबाटेक जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संदीप शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर मृतदेहाची ओळख संदीप शिंदे यांचीच असल्याचे स्पष्ट झाले.
आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शिंदे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करीत आहेत.



