नारायणगाव | प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील आनंदनगर परिसरात उसाच्या शेतात तब्बल ३१ किलो ७८५ ग्रॅम गांजा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या गांजाची अंदाजित बाजारभावानुसार किंमत १५ लाख ८९ हजार २५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी कांदळी येथील आनंदनगर परिसरात राहुल दत्तू घाडगे यांच्या गट क्रमांक ८०८ मधील उसाच्या शेतात प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये गांजा आढळून आला.
या गोण्यांमध्ये हिरवट व काळसर रंगाचा, बोंडे, बिया, पाने आणि काड्या असलेला गांजा आढळला. काही प्रमाणात हा गांजा पाण्यामुळे ओलसर झालेला होता. गोण्यांसह त्याचे एकूण वजन ३१.७८५ किलोग्रॅम असून, प्रति किलो ५० हजार रुपये या अंदाजित दरानुसार त्याची एकूण किंमत १५ लाख ८९ हजार २५० रुपये आहे.

या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अर्थात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा क्रमांक २५३/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई गोरक्ष अशोक हासे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे पुढील तपास करीत आहेत.
उसाच्या शेतात हा गांजा कोणी आणून ठेवला आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता नारायणगाव पोलीस करीत आहेत.



