नारायणगाव प्रतिनिधी:
नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष संतोष नाना खैरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नेहरकर, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटे, माजी सरपंच अशोक पाटे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटे, ज्ञानेश्वर औटी, सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, ज्येष्ठ संचालक रामदास तोडकरी, कैलास डेरे, सीताराम खेबडे, राजेंद्र पाटील, बाळासाहेब भुजबळ,आरती वारुळे,सीमा खैरे,मारुती काळे,बाबाजी लोखंडे,अरुण कोल्हे, चंद्रकांत बनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश गाडेकर आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत नारायणगाव (ता. जुन्नर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने सुमारे ३ कोटी ७५ लाख रुपये खर्चून २५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाची अद्ययावत इमारत उभारली आहे. या इमारतीच्या माध्यमातून सोसायटीला अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होणार असून, सोसायटीची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. इमारतीचे उद्घाटन डिसेंबरमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष नाना खैरे यांनी दिली.

सोसायटीच्या नवीन इमारतीमध्ये १४ व्यावसायिक गाळे, तीन हॉल आणि १८ निवासी सदनिका आहेत. या माध्यमातून सोसायटीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. भविष्यात सोसायटीच्या माध्यमातून सहकारी पतसंस्था सुरू करण्याचा मानस असून, शेतकऱ्यांसाठी सेवा सुविधा केंद्र, जेनरिक मेडिकल, तसेच घाऊक रासायनिक खत विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावरही सोसायटीने भर दिला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०२ सभासद शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. तसेच सोसायटीने उभारलेल्या ३० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे वीज खर्चात बचत होत असल्याचे खैरे यांनी सांगितले.
सभेतील विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश गाडेकर यांनी अहवाल वाचन केले. ज्येष्ठ सभासद अशोक पाटे, दादाभाऊ खैरे, सचिन खैरे, रामदास अभंग आणि शिवाजी गायकवाड यांनी चर्चेत सहभाग घेतला. आमदार शरद सोनवणे, सत्यशील शेरकर आणि आरती वारुळे यांनी मनोगत व्यक्त केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.
हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी आभार मानले.




