नारायणगाव, ता. २३ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य सभासदांच्या आर्थिक स्थैर्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ३० सभासदांना लाभ मिळाला असून, तब्बल ६७१ कोटी ५ लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली.

नारायणगाव येथे जिल्हा बँकेच्या वतीने सहकार मेळावा आणि गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुर्गाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक संजय काळे होते.
तालुक्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ६९ सहकारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी माजी आमदार अतुल बेनके, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे आणि संजय काळे यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

दुर्गाडे म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम जिल्हा बँक करत आहे. संचालक मंडळाला विश्वासात घेऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात असून, सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातील अग्रगण्य सहकारी बँकांपैकी एक आहे.
संजय काळे यांनी सांगितले की, शासनाच्या कर्जमाफी योजनेचा जुन्नर तालुक्यातील ७ हजार ७७८ सभासदांना लाभ मिळणार असून, त्यासाठी ६७ कोटी १५ लाख १२ हजार रुपयांची कर्जमाफी होणार आहे.
माजी आमदार अतुल बेनके म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव काळे आणि स्वर्गीय वल्लभ बेनके यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत विविध निर्णय घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे जुन्नर तालुक्यातील सहकार क्षेत्राला चालना मिळाली असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. हीच सहकाराची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचे काम होत आहे.
दरम्यान, एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी जिल्हा बँकेने एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच सोसायट्यांच्या सचिवांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या शेअर्स योजनेत जुन्नर तालुक्यातील विविध संस्थांनी ६७ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून १८० टक्के उद्दिष्ट साध्य केले, अशी माहिती संचालक संजय काळे यांनी दिली.
कार्यक्रमाला जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे पाटील, प्रवीण शिंदे, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, तालुका फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संतोष खैरे यांच्यासह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाषराव कवडे यांनी केले. नियोजन विभागीय अधिकारी बाळासाहेब मुरादे, संदीप जाधव, रूपेश कवडे, शरद घोंगडे आणि प्रसाद कोल्हे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.



