नारायणगाव प्रतिनिधी :
ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव येथे फुकोकू इंडिया प्रा. लि, चाकण या जपानी कंपनीच्या वतीने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतीसाठी विविध महाविद्यालयांतील १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कंपनीचे मानव संसाधन प्रमुख (एच. आर. हेड) दिपक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून एकूण २० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये रोजगाराची संधी मिळणार असून, या माध्यमातून स्थानिक युवकांना नामांकित जपानी कंपनीमध्ये करिअरची संधी उपलब्ध झाली आहे.

महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पस ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराच्या संधींबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाविद्यालयाच्या वतीने कंपनीच्या प्रतिनिधींचे तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद कुलकर्णी यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कॅम्पस ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. दिनेश गाजूलवार, प्रा. अंकुश पिंगळे व प्रा. आकाश कांबळे तसेच सर्व विभाग प्रमुखांनी विशेष परिश्रम घेतले.




