- नारायणगाव, दि. १७ (प्रतिनिधी): पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याची घटना १० जुलै रोजी रात्री घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जयभान उर्फ लाखन सुभाषचंद त्यागी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी देंद्रसिंग उर्फ बंटी श्रीबाबुराम नामदेव (वय ४६, रा. ग्वालियर, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सोनू उर्फ रामकरन सिंह भदौरीया (वय ३४, रा. ग्वालियर, मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील भारत पेट्रोल पंपासमोर जयभान उर्फ लाखन सुभाषचंद त्यागी व आशिष लखनलाल शर्मा हे दोघे रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची पिकअप भरधाव व निष्काळजीपणे चालवत दोघांना जोरदार धडक दिली.
या अपघातात आशिष लखनलाल शर्मा यांच्या डोक्याला व खांद्याला, तर जयभान उर्फ लाखन सुभाषचंद त्यागी यांच्या कमरेला, छातीला व पोटाला गंभीर दुखापत झाली. दोघांवर उपचार सुरू असताना जयभान उर्फ लाखन सुभाषचंद त्यागी (रा. महाव, आग्रा, उत्तर प्रदेश) यांचा १५ जुलै रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. बी. लोखंडे व सहाय्यक पोलीस फौजदार मुठे करीत आहेत.



