जुन्नर, दि. १९ : जुन्नर शहरातील अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक ४ च्या बंद परिसरात रात्रगस्तीदरम्यान संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या इनोव्हा कार आणि दुचाकीची तपासणी करत पोलिसांनी सुमारे ३.०२८ किलो गांजा, एक इनोव्हा कार, एक ॲक्टिव्हा दुचाकी असा १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.
शनिवार (दि. १९) रोजी पोलीस हवालदार हांडे, पोलीस शिपाई बापू वाघमोडे व अमोल सातपुते हे रात्रगस्त करत असताना शाळा क्रमांक ४ च्या मैदानात एक चारचाकी व एक दुचाकी संशयास्पद स्थितीत उभ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून छापा टाकला.
छाप्यामध्ये मयूर संजय खराडे याच्या ताब्यातील टोयोटा इनोव्हा (MH-12-ET-3911) या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये २.०६६ किलो गांजा आढळून आला. तसेच घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींच्या ॲक्टिव्हा दुचाकीतून ०.९६२ किलो गांजा जप्त करण्यात आला. आरोपी अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क), २०(ब), २०(ब)(ii) तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून फरार दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे, पोलीस हवालदार महेश भालेराव तसेच पोलीस शिपाई दादा पावडे, कैलास केंद्रे, शंभू निरडे आणि अजय इंगोले यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.



