नारायणगाव, दि. १८ (प्रतिनिधी): जुन्नर तालुक्यातील वळणवाडी येथे बंद घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नारायणगाव पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी व दुचाकी वाहने असा एकूण ₹२६ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १७) रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास वळणवाडी येथील एका बंद घरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत जुगार अड्ड्यावर कारवाई केली.
या प्रकरणी जुगार अड्डा चालक सचिन मोहिते व कृष्णा प्रताप माने यांच्यासह जुगार खेळताना आढळून आलेले अजय सांडभोर (रा. खेड), अक्षय तलवार (रा. नारायणगाव), दिनेश गुंजाळ (रा. आळेफाटा), सुनील गोफणे (रा. आळे), मीनानाथ घाडगे (रा. कांदळी), दीपक राठोड (रा. चाकण), सचिन गोफणे (रा. आळे), सोमनाथ भुजबळ (रा. पिंपळवंडी), अन्वर शेख (रा. कैलासनगर), अनिकेत नाईकवाडे (रा. शिरोली), अविनाश पाचपुते (रा. वडगाव), पांडुरंग गायकवाड (रा. कल्याण), विजय शिंदे (रा. धुळे), गणेश कांबळे (रा. मुंबई), अजय जाधव (रा. नगदवाडी) आणि नारायण राठोड (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान रोख रक्कम, चारचाकी व दुचाकी वाहने आणि जुगारासाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ₹२६.६४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.



