नारायणगाव प्रतिनिधी : “राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य”कडे NCMC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी काही एजन्सी/एजंट शासकीय निर्धारित शुल्कापेक्षा जादा पैसे आकारत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत राजे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी नारायणगाव आगार प्रमुख श्री. वसंत अरगडे यांना लेखी निवेदन देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची दखल घेत आगार प्रमुखांनी संबंधित एजन्सींना शासकीय नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यानंतर आळेफाटा येथील एका एजन्सीविरोधात पुन्हा लेखी तक्रार प्राप्त झाली. संबंधित एजन्सीकडून शासकीय शुल्क ₹१९९ असताना तब्बल ₹३०० आकारले जात असल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेकडून ₹३०० शुल्क मागण्यात आल्याने त्या स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नारायणगाव येथे आल्या होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर राजे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी व तक्रारदारांनी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर प्रथम आळेफाटा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नारायणगाव आगार प्रमुख श्री. वसंत अरगडे यांच्याकडेही पुराव्यासह लेखी तक्रार सादर करण्यात आली.
तक्रारीची गंभीर दखल घेत आगार प्रमुख श्री. वसंत अरगडे यांनी संबंधित एजन्सीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली. तसेच, यापुढे कोणतीही एजन्सी किंवा एजंट शासकीय शुल्कापेक्षा जादा रक्कम आकारताना आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
राजे ग्रुप महाराष्ट्र राज्यने नागरिकांना आवाहन केले आहे की, NCMC स्मार्ट कार्डसाठी केवळ शासनाने निश्चित केलेले शुल्कच भरावे. कोणत्याही एजन्सीकडून जादा पैसे मागितल्यास त्याची त्वरित तक्रार संबंधित आगार प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा राजे ग्रुप महाराष्ट्र राज्यकडे करावी.
या प्रसंगी राजे ग्रुप महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष श्री. जुबेर शेख, उपाध्यक्ष प्रसाद हिंगे, सचिव विजय घेगडे, वारूळवाडी सरपंचपदाच्या उमेदवार भाग्यश्री ताजने तसेच नागेश्वरी केदार आदी उपस्थित होते.



