नारायणगाव प्रतिनिधी:
जुन्नर तालुक्यातील नगदवाडी शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन
नगदवाडी ता.जुन्नर,जि.पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रशाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी आकर्षक वारकरी वेशभूषा करून डोक्यावर तुळस,हातात टाळ व भगव्या पताका घेऊन भक्तीमय वातावरणात गावातून दिंडी काढली
शाळेतून निघालेली दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून जात असताना पुणे जिल्हा परिषद पुणेच्या विद्यमान सदस्या कल्पनाताई वैभवशेठ काळे व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष वैभवशेठ काळे यांनी स्वतःहून गाडी थांबवून विद्यार्थ्यांसोबत फोटो काढत दिंडी उपक्रमाचे कौतुक केले व दिंडी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
वारीमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेले रिंगण,टाळ्यांचा गजर,भजन,गवळण,अभंग व ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषांनी वातावरण दुमदुमून निघाले.
कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवणाची व्यवस्था करण्यात आली तसेच सर्वांना केळी व खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेतील शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,आशा आरेकर,उज्वला कांबळे,स्मिता काळे यांनी केले.



