पिंपळगाव प्रतिनिधी:
नुकत्याच जुन्नर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वडज धरणाची पाणी पातळी अचानक वाढली होती व त्यामुळे 15000 क्यूसेक्स ने पाणी मीना नदी पात्रात सोडण्यात आले होते त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मीना नदीकाठी असणाऱ्या वडज,निमदरी, सावरगाव ,पिंपळगाव ,नारायणगाव वळणवाडी आधी गावांमध्ये पुराचे पाणी घरांमध्ये तसेच शेतामध्ये शिरून घरातील वस्तूंचे व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात शेताचे बांध फोडून शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली. शेती वाहून गेल्याने खरीप हंगामात शेती करणं शेतकऱ्यांसाठी जिकीरीचे झाले आहे. शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्राहक कल्याण फाउंडेशन आक्रमक झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास २७ जुलै २०२६ रोजी पिंपळगाव येथील आर्वी मीना नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या वतीने देण्यात आला आहे. पिंपळगाव येथे जिल्हा परिषद शाळेत या संदर्भात बैठकीचे आयोजन करून हा निर्णय घेण्यात आला.या संदर्भात जुन्नर तहसील,नारायणगाव पोलीस स्टेशन, पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख कार्यालय यांना निवेदन देऊन जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी दिली. याप्रसंगी ग्राहक फाउंडेशनचे अध्यक्ष के डी अण्णा सरोदे पिंपळगावचे माजी सरपंच पंकज वऱ्हाडी ,श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन चव्हाण,राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष राजेश गावडे पाटील, माजी सरपंच अरुण वऱ्हाडी, कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग खांडगे आदि उपस्थित होते.



