नारायणगाव, प्रतिनिधी दि. ३० : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव तर्फे आळे परिसरातून चोरीला गेलेला न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर अवघ्या काही दिवसांत शोधून काढत स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून आरोपीला पुढील तपासासाठी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सुनील रामदास ढोमे (वय ३३, रा. पिंपरखेड, ता. शिरूर) यांचा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर २३ जुलै २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता आरोपी जालिंदर तांबे (वय ३२, रा. तांबाराजुरी, ता. पाटोदा, जि. बीड) हा चोरीचा ट्रॅक्टर घेऊन आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून आरोपीला चोरीच्या ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. या कामगिरीत नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सपांगे, महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे तसेच पोलीस कर्मचारी संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, मंगेश लोखंडे, सोमनाथ डोके आणि सुभाष थोरात यांनी सहभाग घेतला. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.



