ओझर प्रतिनिधी:
ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरालगत असलेल्या येडगाव जलाशयात नौकाविहार सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाल्याने श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
जुन्नर हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका घोषित झाल्यानंतर जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे पर्यटनासोबतच अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून आलेले भाविक विघ्नहर्ताच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. आलेल्या भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून विविध विकासकामे राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंदिरालगत असलेल्या येडगाव जलाशयात नौकाविहार सुरू करण्यासाठी ट्रस्टने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता अशी माहिती विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण कवडे यांनी दिली.
येडगाव जलाशयातील नौकाविहारामुळे श्रीक्षेत्र ओझरच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळू श्री विघ्नहराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता नौकाविहाराचाही आनंद घेता येणार असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, तसेच परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल. देवस्थान ट्रस्टच्या वैभवातही या प्रकल्पामुळे भर पडणार असल्याचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी सांगितले.
सदर परवानगीची देवस्थान ट्रस्ट अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. आता शासनाची मंजुरी मिळाल्याने श्री विघ्नहराच्या आगामी जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर नौकाविहार सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचेही कवडे यांनी स्पष्ट केले.
या परवानगीसाठी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष ,विश्वस्त, विद्यमान कार्यकारणी, यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



