काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडनगर चौक, न्याती चौक, रहेस्टा विस्टा चौक, उंड्री व महंमदवाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मॉडीफाईड फटाका सायलेन्सर लावलेल्या दुचाकींचा कर्णकर्कश आवाज करून नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टवाळखोर दुचाकीस्वारांविरोधात काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून १५ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २८१, २९२ तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १८२(अ), १९४(एफ), १९८, १७७, क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट कायदा कलम ७ आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम कलम १२० अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ११ दुचाकी जप्त केल्या. यामध्ये बुलेटसह इतर दुचाकींचा समावेश असून काही वाहनांवर नंबर प्लेटही नसल्याचे आढळून आले.
या प्रकरणात सुमीत वसंत सगट, शिवम दिपक जाधव, आर्यन जगन्नाथ गायकवाड, सार्थक प्रदीप अल्हाट, राज उर्फ यश सागर रणदिवे, अमन, तुषार नितीन गायकवाड, धिरज लक्ष्मण गेंजगे, आयान शेख, प्रेम गायकवाड, दयानंद सुतार, वरद सनी तोडकर, दिनेश रितेश लांबोटे, राजेंद्र सतिश वाघमोडे आणि रवि किसन लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय मॉडीफाईड फटाका सायलेन्सर बसवून देणारे गॅरेज चालक युसूफ फारुख शेख, निखील फुलाजी सरडे आणि रोहन बबलू महापुरे यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच जप्त करण्यात आलेले मॉडीफाईड फटाका सायलेन्सर नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आण्णासो बाबर तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली.
पोलिसांनी नागरिकांना शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था भंग करणाऱ्या तसेच मॉडीफाईड फटाका सायलेन्सरचा वापर करणाऱ्या वाहनचालकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.



