नारायणगाव प्रतिनिधी, दि. ३ : मीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे वडज धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून धरण सध्या ९१.४२ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज (३ ऑगस्ट) सकाळी ८:४५ वाजल्यापासून सांडव्याद्वारे होणारा पाण्याचा विसर्ग ५ हजार क्युसेकवरून ८ हजार क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभागाने दिली आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत असल्याने मीना नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीतील पाण्याचे पंप, शेतीची अवजारे, इतर साहित्य व जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सखल भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी तसेच जलसंपदा विभाग व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभाग, नारायणगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.



