ओतूर प्रतिनिधी ता. ३ ऑगस्ट : जुन्नर तालुक्यातील माळशेज पट्ट्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मढ गावात सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घराची भिंत कोसळून ७५ वर्षीय मंदाबाई शांताराम सदाकाळ या गंभीर जखमी झाल्या. सुदैवाने त्यांच्या मुलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम रामभाऊ सदाकाळ यांच्या घरात ही दुर्घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे घराच्या भिंती कमकुवत झाल्या होत्या. सोमवारी सकाळी मंदाबाई सदाकाळ या आंघोळ करून स्वयंपाकघराकडे जात असताना अचानक घराची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. विटा आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली त्या अडकून पडल्या.
घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा संतोष दत्तात्रय सदाकाळ यांनी प्रसंगावधान राखत धाडसाने आईच्या अंगावरील विटा व माती बाजूला करून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत घरातील वस्तूंचेही मोठे नुकसान झाले असून जखमी मंदाबाई यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जुन्नरचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तहसीलदार भोसले यांनी तात्काळ मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले.
यावेळी तहसीलदार रणजीत भोसले यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ज्या घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत किंवा घरे धोकादायक स्थितीत आहेत, अशा कुटुंबांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. योग्य वेळी खबरदारी घेतल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.”
सध्या माळशेज पट्ट्यात पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



