नारायणगाव, प्रतिनिधी पुणे-नाशिक महामार्गावरील कांदळी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप जीपने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने सहा मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर तीन मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. हा अपघात सोमवारी (३ ऑगस्ट) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
या प्रकरणी पिकअप चालक साहिल गणेश भुजबळ (वय २५, रा. घारगाव, ता. संगमनेर) याला नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी मेंढपाळ महामार्गाच्या कडेला मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना आळेफाटा येथून नारायणगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन थेट मेंढ्यांच्या कळपात घुसले. या भीषण अपघातात सहा मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन मेंढ्या गंभीर जखमी झाल्या.
सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



