नारायणगाव, प्रतिनिधी ता. ४ :
नारायणगाव पोलीस ठाण्यात IX Global या कंपनीसह तिचे अॅप आणि संबंधित कंपन्यांविरोधात ऑनलाइन गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान IX Global कंपनीचे अॅप, TP Global FX, Crypto Land, Debt Box, FX Opulence आदी माध्यमांतून नागरिकांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित कंपन्यांनी दरमहा ५ ते २५ टक्के नफ्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात पुरावे व कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणातील साक्षीदार सुनील रघुनाथ पाटोळे ( रा.वारूळवाडी) यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यांना वरील वेगवेगळ्या अँप मध्ये पैसे गुंतवायला लावून मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून त्यांची वेळोवेळी १,९३,३९,७८२ रुपयांची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, नारायणगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींच्या सहभागाबाबत अधिक माहिती व पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.



