नारायणगाव : प्रतिनिधी
मार्गासाठी रेल्वे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ प्रस्तावित जुन्या मार्गानेच व्हावा, यासाठी रेडिओ शांतता क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा वापर करण्याबाबत जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी सोमवारी (दि. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न मांडले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली.
बिबट्याचा समावेश अनुसूची एकमधून वगळून अनुसूची दोनमध्ये करावा, इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश द्यावेत, जुन्नर येथे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारावे, शिवनेरीच्या पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारण्याच्या प्रकल्पालाही गती द्यावी, अशा मागण्या डॉ. कोल्हे यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत.
तळेगाव, चाकण आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतींसाठी उरण, तळेगाव, चाकण आणि संभाजीनगरला जोडणारा स्वतंत्र मालवाहतूक रेल्वेमार्ग उभारावा, त्यामुळे उद्योगांना न्हावा शेवा बंदराशी थेट जोडणी मिळण्यास मदत होईल, असेही कोल्हे यांनी चर्चेत स्पष्ट केले.



