आळेफाटा प्रतिनिधी : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दहा वर्षांच्या मुलीचा लैंगिक अत्याचारानंतर खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय संशयित आरोपीला आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपळवंडी येथील योगेश पवार यांची चौथी इयत्तेत शिकणारी मुलगी आजारी असल्याने मंगळवारी शाळेत गेली नव्हती. दुपारच्या सुमारास पालक घराबाहेर असताना ती घरातून बेपत्ता झाली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा न लागल्याने आळेफाटा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू असताना शेजारील संशयित तरुणही शोधमोहीमेत सहभागी असल्याचे भासवत होता. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार ‘लेंडे स्थळ’ परिसरातील एका ओढ्याजवळ झाडाशेजारी मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले.
घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीविरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.



